जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ४१६ कोटी ६४ लाखाच्या प्रारूप आराखड्यास मान्यता – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी 416 कोटी 64 लाखाच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तर सन 2022-23 मधील मंजूर नियतव्यय यंत्रणांनी 31 मार्च पूर्वी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. यावेळी खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 प्रारूप आराखडा (सर्वसाधारण) करीता 331 कोटी 82 लाख रूपये,  अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 416 कोटी 64 लाख रूपये नियतव्ययाची मर्यादा शासनाकडून देण्यात आली होती. त्यानुसार एकूण 416 कोटी 64 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. दि. 28 जानेवारी 2023 रोजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यासाठी 112 कोटी 84 लाख रूपये इतक्या वाढीव निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बैठकीत सांगितले.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सन २०२३-२४ च्या प्रारूप आराखड्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ३६ कोटी, कोरोना उद्भवल्यास त्यावरील खर्च भागविण्यासाठी ३० कोटी आणि लम्पी चर्मरोग औषधोपचारासाठी 2 कोटीचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. प्रारूप आराखड्यातील निधी जिल्ह्यातील सर्व कार्यान्वीत यंत्रणांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 (सर्वसाधारण) करीता 364 कोटी रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरीता 83 कोटी 81 लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरीता 1 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 448 कोटी 82 लाख रूपये नियतव्यय मंजूर आहे.  माहे डिसेंबर 2022 अखेर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये शासनाकडून एकूण 255 कोटी 28 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे. यामधील 51 कोटी 72 लाख रूपये इतका निधी खर्च झाला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त झालेला संपूर्ण निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावे, असे निर्देश कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. याबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेली निवेदने यावर यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. वन विभागाकडील रस्त्याच्या कामाबाबत पालकमंत्री महोदयांनी एक विशेष बैठक घ्यावी अशी मागणी आमदार महोदयांनी केली. याबाबत येत्या सोमवारी बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले. या  बैठकीस वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात विषारी सर्प दंश रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास या रुग्णांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडून औषधे पुरविण्याबाबत चर्चा होवून राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी जी अतिक्रमणे झाली आहेत ती संबंधित विभागानी तातडीने काढून घ्यावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. खाडे यानी बैठकीत दिले. तसेच आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर शेंडगेवाडी गावाबाबत शासन निर्णय होईपर्यंत या गावातील ग्रामस्थांना हवे असणारे सर्व प्रकारचे दाखले बनपुरी ग्रामपंचायतीमार्फत दिले जावेत, असे आदेश पालकमंत्री डॉ. खाडे यांनी  संबंधीत यंत्रणांना दिले. शासकीय वसतिगृहातील मुलांना तातडीने अनुदान मिळावे यासाठी समाज कल्याण विभागाने येत्या आठ दिवसात निधी वर्ग करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात 39 कोटी 65 लाख रूपये रक्कमेची एकूण 50 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यास तसेच 500 स्मार्ट अंगणवाडी करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज मेडीकल कॉलेज करीता MRI मशीन खरेदी करण्यासाठी 16 कोटी रूपये रकमेस मान्यता देण्यात आली आहे. मिरज मेडिकल कॉलेज येथे 600 कि. वॅट क्षमतेचे पारेषण संलग्न सौर प्रकल्प आस्थापित करण्यासाठी 3 कोटी 81 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. लम्पी आजारावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 1 कोटी 86 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जलनि:सारण विभागाकरीता अत्याधुनिक पध्दतीचा मॅन होल मधील गाळ काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर रोबोट खरेदी करण्यासाठी 40 लाख रूपये रकमेच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

00000