तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या.

अक्कलकोट व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा तयार करून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासोबतच त्याचे पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर करण्याबाबतचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

नियोजन भवन सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीस आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, अप्पर जिल्हाधिकारी तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हिम्मत जाधव, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी सचिन पाटील आणि अरविंद माळी आदि उपस्थित होते.

यावेळी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सादर करण्यात आली. अक्कलकोट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीशी चर्चा करून अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.  हा आराखडा 368 कोटी रुपयांचा असून या आराखड्यांतर्गत वाहनतळ विकास, रस्ते विकास, शौचालय, बांधकाम, आरोग्य सुविधा, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा, उद्यान विकास, विद्युतीकरणाची कामे आदि कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिली.

त्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, आराखडा कृती समिती आदिंसह नागरिकांनी केलेल्या सादर केलेल्या आढाव्याच्या अनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केली.

पंढरपूर विकास आराखड्याबाबत ते म्हणाले, हा आराखडा बनवत असताना यात्रा कालावधी व वर्षभर येणारे भाविक, परंपरा व गर्दी या दोन्ही स्वतंत्र बाबींचा विचार करून आराखड्यात नव्याने कामे समाविष्ट करावीत. पंढरपूरच्या आजूबाजूच्या गावांमधून यात्रा कालावधीमध्ये पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना वाहनतळापासून शहरात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच, आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या सूचनादेखील आराखड्यामध्ये समाविष्ट कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूरच्या आसपास अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर अशी तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे एक किंवा दोन दिवसांत सर्व ठिकाणी भेट देण्याचा भाविकांचा प्रयत्न असतो. मात्र, यामुळे वाहनचालकांवर ताण येऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनतळाजवळ वाहनचालकांसाठी विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्याची गरज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी व्यक्त केली. त्याचाही विचार आराखड्यात करावा, अशी सूचना श्री. विखे पाटील यांनी यावेळी केली.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भगवंत मंदिराचा विकास करण्याची मागणी केली. याबाबत विचार करण्याची ग्वाही श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

00000