आधुनिक जीवनशैलीनुसार मानवाच्या दैनंदिन आहारात बदल झाला आहे. या बदलत्या आहारामुळे शरीरास आवश्यक पोषक तत्त्वांची उणीव भरुन काढून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची गरज निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पांरपरिक आहाराला चालना देवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी प्रत्येकानेच या कार्यक्रमाचा भाग होवून पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव
भारताने इतर काही देशांच्या मदतीने तृणधान्याचे महत्व सर्व राष्ट्रांना समजावे म्हणून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष हा ठराव संयुक्त राष्ट्र संघात मांडला. 70 देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व 193 सदस्य राष्ट्रांनी भारताच्या या प्रयत्नाचे कौतुक करत हा ठराव बहुमताने मंजूर केला. आपल्या देशाच्या या प्रयत्नामुळेच 3 मार्च 2021 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे ठरले आणि सर्व सदस्य राष्ट्रांनी त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.
‘पौष्टिक तृणधान्य दिन’
वर्षारंभी मकर संक्रांत-भोगी या सणाला पौष्टिक तृणधान्ययुक्त पदार्थांचा आहारामध्ये वापर करण्याची परंपरा आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व अधोरेखित करण्यासाठी मकर संक्रांती-भोगी हा ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा आहे हा कार्यक्रम
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. यावर्षी 15 जानेवारीला मकर सक्रांत असल्याने 14 जानेवारीला भोगी हा सण साजरा होत आहे. ‘न खाई भोगी, तो सदा रोगी’ हा वाक्प्रचार सर्वत्र रुढ आहेच. ह्या सणाला शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी, तीळ लावलेली बाजरीच्या भाकरीचे सेवन करतात.
ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये तर राळा, वरई, कोद्रा, सावा व राजगिरा ही इतर लघु तृणधान्ये आपली पारंपरिक पिके आहेत. पूर्वीपासून आपल्या आहारात असलेल्या या तृणधान्यांचा वापर शहरीकरणाच्या व पाश्चात्य अनुकरणाच्या ओघात कमी होत गेल्याचे कटू सत्य तर पिझ्झा, बर्गर आदी जंकफुडचा अवास्तव उपयोग वाढल्याचे चित्र आपल्या समोर आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असे विकार वाढत आहेत. याचे दुष्परिणाम पाश्चिमात्य देशांच्या लक्षात आले आहे, म्हणूनच कोरोनानंतर आरोग्यविषयक सजगता वाढून या देशांमध्ये पौष्टिक तृणधान्याची मागणी वाढल्याचा अहवाल आहे.
पौष्टिक तृणधान्याचा असा होतो फायदा
पौष्टिक तृणधान्यात जीवनसत्वे व खनिजांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ म्हणजे रक्तातील साखरेवर होणारा परिणाम कमी असल्याने ती मधुमेह रोधक आहेत. तसेच काही पिके ‘ग्लुटेन फ्री’ असल्याने ही पचनाला उत्तम ठरतात. तसेच त्यात तंतुमय पदार्थ, ॲण्टिऑक्सिडंट आणि रोगांना प्रतिकार करण्याचे गुणधर्म आहेत. ही तृणधान्ये कॅल्शीयम, लोह, झिंक, आयोडीन इत्यादी सूक्ष्म पोषक घटकांमध्ये समृद्ध आहेत. ग्लुटेनमुक्त असल्याने गव्हासाठी एक पर्याय म्हणून याचा वापर केल्या जातो.
शासनाचा पुढाकार
तृणधान्यापासून बनवलेले पदार्थ पचायला हलके व पौष्टिक असल्याने आरोग्यविषयक समस्यांवर शहरी नागरिकांमध्ये त्याविषयी जागरूकता वाढत आहे. तृणधान्य पिकांचे ग्राहक वाढत असल्याने त्याचा थेट फायदा या धान्यउत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य शासनामार्फत देखील “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्यांच्यातील औषधी व पौष्टिक गुणधर्माचे फायदे नागरिकांना पटवून देण्यासोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील तृणधान्य उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
तृणधान्य उत्पादनाचे शेतकऱ्यांना सर्वसाधारण फायदे
शेतकऱ्यांसाठी तृणधान्य उत्पादनाचे सर्वसाधारण फायदे बघीतल्यास कमी गुंतवणुकीत ही पिके घेता येतात. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांना कमी पाणी लागते तसेच ती वातावरणाचा ताण सहन करू शकतात. तृणधान्य पिकांची वेगाने वाढ होते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकांबाबत कीड-रोग समस्या फारशा नाहीत. कमी क्षेत्रातही ही पिके यशस्वीरित्या घेतली जावू शकतात. स्वास्थ्य आहारासोबतच जनावरांनाही चारा पुरवतात. कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नास पौष्टिक तृणधान्य पिके पूरक आहेत.
नागपूर विभागातही प्रभावी अंमलबजावणी
नागपूर विभागात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व वर्धा या धान उत्पादक जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विभागात रबी ज्वार पिकांचे 5878 हेक्टर क्षेत्रावर प्रात्याक्षिके राबविण्यात आली आहेत तसेच 14.48 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरण करण्यात आले आहे. यासोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, सुधारित कृषी औजारे, पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण या बाबींवर कृषी विभागाने लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक यांनी दिली.
तृणधान्य पिकांमधील पोषक मूल्यांमुळे परिपूर्ण आहार आणि पोषण संरक्षण मिळते. हा आहार लहान बालके, गरोदर स्त्रीया, यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरिकांना आरोग्यवर्धक ठरत असल्याने तृणधान्य पिकांची मागणी वाढत आहे. ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ही पिके आर्थिक फायदेशीर ठरणार आहे. भविष्यातील कल पाहता सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यासाठी तसेच शेतकरीवर्गाला आर्थीक उत्पन्न वाढीसाठी तृणधान्य पिके फायदेशीर ठरणार आहेत. चला तर मग सर्वांनी तृणधान्य पिकांचा वापर करूया 000000
– गजानन जाधव,
माहिती अधिकारी, नागपूर