मुंबई, दि. १६ : डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी भव्यता फाऊंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार, रोमा सिंघानिया, नीला पारीख, गोरक्षनाथ गंभीरे, रीना जोगानी आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. ज्या अंतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. व व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत आहे. लोकसहभागातून सामाजिक संस्था या क्षेत्रात काम करू शकतात. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाड्या दत्तक घेवून या अंगणवाड्यातील बालके व मातांना सक्षम करण्यासाठी मदतच केली आहे, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.
आदिवासी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्येही काम करणार : कुलीन मणियार
भव्यता फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार म्हणाले, 2018 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नियुक्त केलेल्या 37 बालवाड्या भव्यता फाउंडेशन चालवत आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करून मुंबईतील आणखी पाच अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी राज्य शासन आणि महिला व बालकल्याण विभाग यांनी खूप सहकार्य केले आहे. कॉर्पोरेट्स आणि उल्लेखनीय सामाजिक संस्थांसोबत भागीदारी करून, विस्तार योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांतील आणखी 100 अंगणवाड्यांमध्ये ही सामग्री आणि रचना पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील बोलीभाषांची विविधता लक्षात घेऊन आणि मातृभाषेतून शिकवण्याची गरज लक्षात घेऊन डिजिटल अंगणवाड्या हे शहर-आधारित प्ले स्कूल आणि आरंभ एलएमएसच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत.
यावेळी भव्यता फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/