मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी  आपली जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडावी

अमरावती, दि. 17 : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक 2023 कार्यप्रणालीबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांनाचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण प्रशिक्षक सहायक आयुक्त (भूसुधार) शामकांत म्हस्के तसेच उपायुक्त (पुर्नवसन) गजेंद्र बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, नोडल अधिकारी मनिष गायकवाड, रणजीत भोसले, राम लंके, धारणीचे उपजिल्हाधिकारी सावंत कुमार, तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पावरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे सादर करण्यात आले. यामध्ये मतदान पध्दतीबाबत सूचना, मतदान प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेव्दारे माहिती देण्यात आली.

मतदान दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणूकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षेत सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशीलावर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अनुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले.

000000