चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. त्यातही विदर्भात हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देवून वरील मागणी केली.

विदर्भात तळी, मालगुजरी तळी, शेत तळी आदी असे एकूण 30,650 तळी आहेत. यात 1, लाख 87 हजार 249 हेक्टर  पाण्याचे क्षेत्र आहे. यातील 50  टक्के तळ्यात मासेमारी केली जाते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण सीमेला वैनगंगा आहे, तर पश्चिम सीमेला वर्धा नदी आहे. याठिकाणी 5,547 जल समिती (वॉटर बॉडीज) असून 25,429 हेक्टर पाणी क्षेत्र आहे. यामधील  29 टक्के तळी मत्स्यव्यवसायासाठी वापरले जातात तर 20 टक्के तळी हे शेत तळे  आहेत.

देशातील इतर भागात ज्याप्रमाणे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली आहेत, त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्येही संशोधन केंद्र उभारण्यात यावे. यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा जलदगतीने विकास होऊ शकेल. मत्‍स्य बीजपुरवठा, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती ही प्रशिक्षणाद्वारे देऊन कौशल्य विकास करता येईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मत्स्यव्यवसाय पूरकव्यवसाय म्हणून अधिक उपयोगी ठरत आहे. विदर्भात मत्स्यबीज समूह केंद्राला (फिश सीड क्लस्टर) संधी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या समन्वयाने चंद्रपूर येथे  प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.

०००