कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
7

मुंबई दि. 18 : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आगामी काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे वास्तुरचनाकार इंद्रजीत नागेशकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोयीसुविधा निर्माण करताना त्या आधुनिक काळाशी सुसंगत असतील तसेच या कामांची गुणवत्ता टिकून राहील याकडे लक्ष देण्यात यावे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना कोल्हापूर चित्रनगरीच्या अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील नियोजन करुन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबरोबरच आवश्यक त्या निविदा काढण्याबाबत सूचना देण्यात दिल्या. तसेच महाराष्ट्रातील संतांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्यावर मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असल्यास मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी जी सूट देण्यात येते तीच इतर भाषांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना देण्याबाबत विचार करता येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

कोल्हापूर चित्रनगरी येथे रेल्वे स्थानकाचा कायमस्वरूपी चित्रीकरण सेट तयार करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहरी बाजू आणि दुसरीकडे ग्रामीण बाजू तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे यासाठी एक स्पर्धा घेऊन संकल्पना चित्र अंतिम करावे, अशा सूचनाही यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. या बैठकीत सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे, बाह्य स्तोत्राद्वारे सुरक्षारक्षक पुरविणे, कर्मचारी पुरविणे, कोल्हापूर चित्रनगरीत आवश्यक तेथे पथदिवे लावणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here