महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ

मुंबई, दि. २४ :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्या ॲड.गौरी छाब्रिया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या खटल्यात संवेदनशीलतेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, विधवा प्रथा बंदीचा ठराव करत ऐतिहासिक पाऊल उचलणारी हेरवाड ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सुरक्षिततेकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ, आयोगाच्या वर्ष २०२३ च्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन, राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डिंग ब्रिज या टुलकिट पुस्तिकेचे प्रकाशन, हे कार्यक्रम यावेळी होणार आहेत.

000

संध्या गरवारे/विसंअ