उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधिन करणाऱ्या अधिनियमात सुधारणा

मुंबई, दि. २५ : उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे नियमाधीन करणाऱ्या अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. या सुधारित अधिनियमास राज्यपालांची संमती मिळाली आहे. त्यामुळे हा अधिनियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या अधिनियमास उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे (सुधारणा) अधिनियम २०२२ असे म्हणण्यात येणार आहे.  तसेच अधिनियमातील कलम तीनमध्ये पोट कलम तीन मधील खंड ‘ क ‘ तील ‘ पुढील तक्त्यानुसार निर्धारित केलेली ‘ या मजकुरा ऐवजी ‘ विहित करण्यात येईल अशी ‘ हा मजकूर दाखल करण्यात येईल. तसेच फिचा तक्ता वगळण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मुख्य अधिनियमाच्या कलम चारमध्ये पोट कलम तीन मधील खंड ‘ क’ च्या परंतुकामधील ‘४.०० हून  अधिक तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) ‘ या मजकुराऐवजी ‘ उल्हासनगर शहर महानगरपालिकेला लागू असलेल्या महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन विनियमांमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे तलपृष्ठ निर्देशांक (एफ.एस.आय) पेक्षा अधिक तलपृष्ठ निर्देशांक ‘ हा मजकूर दाखल करण्यात येईल. अशी सुधारणा करण्यात आलेला अधिनियम प्रसिद्ध करण्यात आला आहे.

000

निलेश तायडे/ससं