संविधानातील मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ – पालकमंत्री अब्दुल सत्तार

0
7

हिंगोली(जिमाका), दि.26 : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज भारतीय संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले .

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी  आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्र. पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,  अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी  पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला, असे सांगितले.

आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचेही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस विदितच आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वा‍गिंण विकासासाठी काम करत आहोत. राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्ती व कुष्ठरोग निर्मुलनाची शपथ दिली. तसेच आंतरराष्ट्रीय  पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागाच्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here