नवी दिल्ली,27 : मराठी भाषेला मिळालेली समृद्ध संपदा वाढवूया तसेच अधिकाधिक उत्तम दर्जाचे साहित्य मराठी भाषेत निर्माण करूया, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ या वर्षारंभ विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. याप्रसंगी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास सपकाळ, परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर, ग्रंथपाल रामेश्वर बर्डे यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हा विशेषांक परिचय केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
श्री. मुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा समृद्ध असा इतिहास आहे. मराठी भाषा ही भावनांसह लोककला, साहित्य, लोकगीते, लोकनाट्य या सर्वांची संवाहक अशी ही भाषा आहे. मराठी भाषेत गेल्या 1500 वर्षात अनेक महाग्रंथ, दीर्घ कविता, खंडकाव्य निर्माण झालेले आहेत. तर अलीकडच्या काळात कांदबरी, कथा, लोककथा, निबंध अशा प्रकारचे विपुल साहित्य मराठीत निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसह महाराष्ट्राबाहेरील मूळ मराठी मातीशी जुळलेली 2 कोटी जनताही मराठीत बोलते ही अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. जसे आपण जैववैविध्य जपतो तसेच आपल्याला भाषा वैविध्यही जपता आले पाहिजे. आज तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे इतर भाषेचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपली साहित्याची समृद्ध पंरपरा जर टिकवायची असेल तर या साहित्य संपदेला पुढे नेऊया, यात अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्माण करू या, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ सारख्या उपक्रमात जास्तीत जास्त मराठी लोकांनी भाग घेतला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. डॉ. मुळे यांनी आर्याबाग या अंकात त्यांनी लिहिलेल्या कवितेचे वाचन याप्रसंगी केले.
विश्वास सपकाळ म्हणाले, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, मात्र आपली समृद्ध संस्कृती, साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचविता येईल याचा देखील प्रयत्न व्हायला हवा. फिजी आणि नौरू येथे राजदूत असताना हाय कमीशनच्या माध्यमातून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून येथील लोकांना महाराष्ट्रातील संस्कृतीचा परिचय करून दिल्याच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनीय ठिकाणी मराठीमध्ये सुविचार लिहिले जात आहे. येथील नूतन मराठी शाळेत काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासह मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, अशा कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले.