महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
15

वर्धा, दि.3 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम राज्य शासन करीत आहे. महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी सर्वकाळ प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीस भेट देऊन बापूंना अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ. पंकज भोयर, भंडाराचे आमदार नरेंद्र बोंडेकर, नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते.

वर्धा येथे आयोजित 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आले होते त्यावेळी त्यांनी सेवाग्राम बापूकुटीला भेट दिली. आश्रमातील प्रार्थना सभेत त्यांनी सहभाग घेतला. नोंदवहीत आपले अभिप्राय देखील नोंदविले.

सर्व घटकातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम राज्य शासन करीत असून समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील विकासाला चालना मिळेल. यासोबतच संपूर्ण राज्यात विकासाचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी आश्रमाची पाहणी केली. येथे आल्यानंतर महात्मा गांधीजींच्या साध्या राहणीमानाच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

आश्रमात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पुष्पगुच्छ व सुतमालेने त्यांचे स्वागत केले. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा, सर्वसेवा संघाचे अध्यक्ष चंदनपाल, टी.आर.एस प्रभू, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे यांची उपस्थिती होती.

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here