साहित्य संमेलनात खेळा लुडो, सापसिडी; जाणून घ्या निवडणूक आयोगाचा इतिहास
वर्धा, दि. 4 (जिमाका) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हसत खेळत मनोरंजनातून जनजागृती केली जात आहे. सापसिडी, लुडोचा आनंद घेत घेत नवमतदार मतदानाचे महत्व, मतदार नोंदणी, निवडणूक आयोगाचा इतिहास समजून घेत आहे. मुलांच्या या खेळात अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा.श्रीकांत देशपांडे यांनी सहभाग घेतला. खेळात विजयी झालेल्या मुलांना त्यांनी बक्षिसे दिली.
गेल्या तीन वर्षांपासून साहित्य संमेलनात निवडणूक जनजागृती या विषयवार विविध उपक्रमांसह विशिष्ट परिसंवाद निवडणूक आयोगाच्यातीने आयोजित केला जातो. आयोगाच्यावतीने वर्धा येथील संमेलनात आयोगाच्या या उपक्रमांना नवमतदारांसह सर्वसामान्य नागरिक, मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे आयोगाच्या जनजागृती खेळांचा नवमतदार आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
आयोगाच्यावतीने चार स्वतंत्र दालने लावण्यात आली आहे. त्यातील दोन दालनांमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा इतिहास दाखविण्यात आला आहे. आयोगाचा हा रंजक आणि तेवढाच खडतळ प्रवास पाहतांना लोकशाहीच्या सुरुवातीपासूनचे आतापर्यंतचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. याठिकाणी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराचा फोटो व माहिती तसेच निवडणूक प्रक्रियेत होत गेलेला बदल दर्शविण्यात आला आहे.
दुसऱ्या दालनात निवडणूक आयोगाच्यावतीने प्रकाशित व निवडणूक जनजागृती विषयक पुस्तके ठेवण्यात आली आहे. ही पुस्तके विक्रीस सुध्दा उपलब्ध आहे. याच ठिकाणी संमेलनात येणाऱ्या नागरिकांना मतदानाचे महत्व, मतदार नोंदणी, नोंदणीतील बदल करण्याची सोय उपलब्ध आहे. याठिकाणी उपस्थित असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी नागरिकांना लागणारे सर्व सहाय्य उपलब्ध करून देत आहे.
संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाच्या परिसरात विशेष जनजागृती चित्रफित दाखविण्यात येत आहे. ही चित्रफित देशातील विविध भाषांमध्ये आहे. याच ठिकाणी जनजागृती सापसिडी व लुडोचा खेळ आहे. येथे नवमतदार या खेळांसोबत मतदानाचे महत्व समजून घेत आहे. या खेळांना मुख्य निवडणूक अधिकारी डॅा.श्रीकांत देशपांडे यांनी भेट देऊन नवमतदारांसोबत खेळात सहभाग घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार रमेश कोळपे उपस्थित होते.
000000