महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा -दि.5- कोरोना संसर्गामुळे  विविध प्रतिबंध लादण्यात आले होते. या प्रतिबंधामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. महामंडळ हे सर्वसामान्यांचे परिवहनाचे साधन आहे या महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले

पाटण एसटी बस आगाराला नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत त्याचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी सुनील गाडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजीराव जगताप, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक दयानंद पाटील आदी उपस्थित होते

 

परिवहन महामंडळ  उर्जितावस्थेत  आणण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक एसटी डेपोला नवीन बसेस व इलेक्ट्रॉनिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच डोंगरी भागासाठी लहान बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .शासनाने नेहमीच परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांनीही उपलब्ध होणाऱ्या बसेस चांगल्या पद्धतीने वापराव्यात व शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे.

स्वच्छ व सुंदर डेपोसाठी राज्य शासनाने पारितोषिक जाहीर केले आहे हे पारितोषिक  पटकविण्यासाठी पाटण आगाराने प्रयत्न करावा. बस स्थानक विस्तारणीकरणाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. विविध विभागांच्या माध्यमातून विस्तारणीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा असेही पालकमंत्री श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक  शिवाजीराव जगताप यांनी केले तर आभार आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी मानले

या कार्यक्रमास परिवहन महामंडळातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.