सातारा दि. ८ – सातारा व खटाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये लवकरच शेतीसाठीही पाण्याची सोय केली जाईल असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सातारा तालुक्यातील देगांव आणि खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी देगांव सरपंच वैशाली साळुंखे, उपसरपंच मनोज लोणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पुसेगाव येथील कार्यक्रमावेळी एम.जी.पी. च्या अधिकाऱ्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जल जीवन मिशनच्या माध्यमातून सोडवण्यात आला आहे. लवकरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल. शेतीसाठीही शाश्वत पाणी पुरवठा करण्याची योजना राबवली जाणार आहे. देगाव व पुसेगाव भागात शेतीसाठी धरणांमधील पाणी पोहोचवण्यात येईल. पुसेगाव येथे १७ कोटी ३९ लक्ष रुपयांची योजना उभारण्यात येत आहे. तर देगांव येथे १३ कोटी ७० लाख रुपयांची योजना उभारण्यात येत आहे.
०००