राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट

 जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सदिच्छा भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी त्यांचे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकाचा विश्व मराठी संमेलन हा विशेष अंक भेट देऊन स्वागत केले.

आयुक्त श्रीमती कुलकर्णी यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. त्या म्हणाल्या की, राज्य शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकाचे अंक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असतात तसेच हे अंक संग्राह्य असतात. राज्य शासनाच्या विविध सेवा आता ऑनलाईन होत आहेत. त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवांची संख्या वाढेल. त्याचीही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती कुलकर्णी या तीन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी येथील प्रशासकीय इमारतीस भेट देऊन तेथील कृषि विभाग, महिला व बालविकास विभाग, सहकार विभाग, मुद्रांक विभागास भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सह जिल्हा निबंधक सुनील पाटील, तंत्र अधिकारी संजय पवार आदि उपस्थित होते.

000