मॉडेल स्कूल व मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरच्या कामांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून प्राधान्य देण्यात यावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
4

ठाणे, दि. 8 (जिमाका) – ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा आढावा आज पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. जिल्ह्यातील शाळा मॉडेल स्कूल करण्यासाठी व आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मनिषा शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन श्री. देसाई म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित उपयोजना व विशेष घटक योजनेतून आतापर्यंत झालेल्या कामांचा व निधी खर्चाचा आढावा घेतला. उपलब्ध नियतव्यातून 65 टक्के खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाने दिलेला सर्व निधी जिल्ह्यातील यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने या वर्षीचा निधी खर्च करून पुढील वर्षी आणखी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून ठाणे जिल्ह्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा, यासाठी मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे राज्यस्तरीय बैठकीत मागणी केली आहे. सन 2023-24 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यासाठी 850 कोटींच्या निधीची मागणी केली आहे. यावर्षी ही रक्कम 618 कोटी रुपये मिळाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या जिल्ह्यासाठी आणखी विशेष वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यात सहा ग्रामीण रुग्णालये आहेत. त्या रुग्णालयांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी केले निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक, निरुपणाकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण जाहीर केला आहे. याबद्दल पालकमंत्री श्री. देसाई यांनी श्री. धर्माधिकारी यांचे अभिनंदन केले.

पौष्टिक तृणधान्य पोस्टरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

जिल्हा कृषि विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या तृणधान्यविषयक पोस्टरचे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आले.

 000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here