सामाजिक वनीकरणच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वितरण

ठाणे, दि. 8 (जिमाका) – सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विभागस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज वितरण झाले. सामाजिक वनीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या पाठबळावर हरित क्रांतीचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन श्री. देसाई यांनी यावेळी केले.

सामाजिक वनीकरण विभागाच्या ठाणे वृत्तच्या वतीने सन 2018 व 2019 या दोन वर्षांच्या वनश्री पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी  आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, वनविभागाच्या ठाणे प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, वनसंरक्षक के. प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक जी. मल्लिकार्जून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मनिषा शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले की, सामाजिक वनीकरण क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या संस्था, शाळा व व्यक्तिंचा आज छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा हा शहरीकरणाबरोबरच वनाने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाचे चांगले काम सुरू आहे. आपली वनसंपदा जपण्यासाठी, वाढविण्याची गरज आहे. अनेक संस्था या कोणत्याही शासकीय अनुदान, निधीची अपेक्षा न ठेवता या क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून व अशा संस्थांच्या सहकार्याने चांगले काम होईल.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

शैक्षणिक संस्था विभागात सन 2018 साठी प्रथम क्रमांक – माध्यमिक विद्यालय (माड्याची वाडी, नेरुर ता. कुडाळ, सिंधुदुर्ग), द्वितीय क्रमांक – विश्वेश्वर विद्यामंदीर (गावडे, आंबरे, ता. रत्नागिरी), सन 2019 साठी – प्रथम क्रमांक – श्रीरंग विद्यालय, (श्रीरंग शिक्षण संस्था, ठाणे) व चेंबूर कर्नाटका संघ हायस्कूल (चेंबूर, मुंबई), द्वितीय क्रमांक – अनुयोग शिक्षण संस्था (खार, मुंबई) व सेंट कोलंबा स्कूल (डॉ. काशिबाई नवरंगे रोड,गावदेवी मुंबई).

सेवाभावी संस्था विभागात सन 2018 साठी प्रथम क्रमांक – रुद्र प्रतिष्ठान (सावरकर नगर, ठाणे), द्वितीय पुरस्कार – सह्याद्री प्रतिष्ठान (शाहूनगर, चिंचवड, पुणे). सन 2019 साठी प्रथम क्रमांक – सगुणा रुरल फाऊंडेशन   (ता. कर्जत, जि. रायगड), द्वितीय क्रमांक – वेदा जनजागृती मंच (डॉ. नांदगावकर हॉस्पिटल जवळ, महाड, जि. रायगड) अशी विजेत्यांची नावे आहेत.

000