सांगली दि. 9 (जिमाका) :- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनेतून जिल्ह्यात करण्यात येत असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हा परिषद येथील आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांच्यासी जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
विकास योजनांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे. विकास योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. विकास योजनांवरील मंजूर निधी त्या-त्या योजनांवर पूर्णपणे खर्च व्हावा. तसेच निधी परत जावू नये याची दक्षता घ्यावी. मंजूर विकास कामे, पूर्ण झालेली कामे, प्रगती पथावरील कामे आणि अपूर्ण कामे याचा अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा. विकास कामांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी आढावा बैठकीत दिल्या.
ग्रामपंचायतीलकडील जनसुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना करुन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. देशाच्या प्रधानमंत्री महोदयांची ही महत्वाकांक्षी योजना असून प्रत्येक गावात ही योजना प्राधान्याने राबवावी. या बरोबरच घरकुलांच्या योजनांची कामे, बांधकाम विभागाकडील कामे, पाणी पुरवठा योजनांची कामे, महिला व बाल विकास विभाग यासह सर्वच विभागांनी त्यांच्यकडील कामे गतीने पूर्ण करण्यासाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या.
000