उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणार – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर

मुंबई, दि. 13 : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023’ आयोजित कार्यशाळेत कमल किशोर बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई, भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज, देशातील विविध राज्यातील व  महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ कार्यशाळेत सहभागी आहेत.

श्री. कमल किशोर म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून जगभरात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येऊन उष्णतेच्या लाटांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा तयार करणे या अनुषंगाने कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन यातून एक चांगले विचारमंथन घडून येईल, असेही कमल किशोर म्हणाले.

आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना दिलासा मिळणे गरजेचे – प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता

मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले की, राज्यात विविध आपत्तींमध्ये होणारी मनुष्यहानी टाळण्याकरता राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते. उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था आणि या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. कोणत्याही आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण, उपयुक्त कल्पनांच्या देवाण-घेवाणीसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे, असेही प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशिस चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांनी प्रास्ताविक केले.

००००

संध्या गरवारे/श्रद्धा मेश्राम/13.2.2023