मुंबई, दि. 13 : सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा सन्सचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन उपस्थित होते
ही बैठक महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी ही बैठक क्रांतीकारक ठरेल. राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ह्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे राज्य असून महाराष्ट्राच्या सहभागाने पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वपूर्ण आहे.
आर्थिक विकासाबरोबरच, शेती, शेतकरी त्यातील प्रत्येकाच्या राहणीमानाचा विचार ही परिषद करणार आहे. सामान्य माणूस हाच विकासाच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असणार आहे. शेती क्षेत्रातील उत्पादन वाढ, तंत्रज्ञानाचा वापर, वित्तपुरवठा याबाबत परिषद अभ्यास करून सूचना, शिफारशी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
विकासाचा रोडमॅप तयार करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विकासासाठीचे व्हिजन या संदर्भात सादरीकरण केले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या बैठकीत कृषी क्षेत्र, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि विभागीय असमतोल दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या परिषदेत वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले सदस्य आहेत. त्यांनी आपली मतं मांडली तर परिषदेचे अध्यक्ष यांनी परिषद सदस्यांच्या सूचना असलेले सादरीकरण केले. या बैठकीत परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोड मॅप तयार करण्यात येईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
राज्यातील संधींना गतीमानता प्रदान करण्यासाठी परिषदेतील सदस्य आपले योगदान देण्यास उत्सुक असून आर्थिक विकासाच्या विविध कल्पना या परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या असल्याची माहिती , परिषदेचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी दिली. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे देशासाठी महत्त्वपूर्ण राज्य आहे. राज्याचे (जीडीपी) सकल देशांतर्गत उत्पादन सर्वात जास्त आहे. इथे पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. राज्याच्या आर्थिक विकासासह प्रत्येकाचे जीवनमान उंचावण्यासाठी, दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी, चर्चा करण्यात आली. यासोबतच कृषी, कृत्रिम बुद्धीमत्ता, हरित मार्ग, या सारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या परिषदेच्या माध्यमातून सोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असे एन.चंद्रशेखरन यांनी यावेळी सांगितले.
००००