मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

0
26

मुंबई, दि. १५ : मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कार जाहीर केले.

सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. तर वयाची ज्येष्ठता ८७ वर्ष. त्यांना यापूर्वी विविध पुरस्कार, आदर्श शिक्षक तसेच राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

श्री. पु. भागवत पुरस्कार २०२२ ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रकाशित ग्रंथांची संख्या १ हजार २४०, सतत ४८ वर्ष कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.

डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) दिला जाणारा पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोली चे संशोधन, देश विदेशात काव्य वाचनातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कांदबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे.

कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) श्री. द. ता. भोसले यांना जाहीर झाला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्वाची पुस्तके, खेड्यातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्ष ते कार्यरत आहेत.

डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९०६, मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकास व प्रचारासाठी कार्यरत, विविध साहित्य प्रकारातील ४० हून अधिक पुरस्कार या संस्थेद्वारे प्रदान करण्यात येतात. लेखन कार्यशाळा सारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.

कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९९९, मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी कार्यरत साहित्य संमेलने, लेखक वाचक संवाद लेखन कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here