कनाशी वीज उपकेंद्राच्या मंजूरीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली मागणी

0
10

नाशिक, दिनांक: 16 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : कळवण या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील कनाशी येथे १३२/३३ के.व्ही. कनाशी उपकेंद्र मंजूर करण्यासाठी माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार कनाशी गावातील १३२ केव्ही उपकेंद्रासाठी संपादित केलेली जमीन महावितरण विभागाकाडे सुपूर्द करण्यात  आली होती. मागील अनेक वर्षापासून कनाशी येथे १३२/३३ केव्ही उपकेंद्र सुरु करण्याबाबत वारंवार मागणी करून देखील शासन स्तरावर विषय प्रलंबित असल्याने शेतकरी व स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची असलेली मागणी विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन कनाशी येथे वीज उपकेंद्रास मंजूरी देण्याची मागणी केली असता, त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबंधित विभागास दिल्या असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

कनाशी येथील १३२/३३ के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यातील विजेच्या समस्येचा प्रश्न मार्गी लागणार असून आदिवासी बांधवाना अखंडीत व सुरळीत वीज पुरवठा मिळणार आहे. सध्यस्थितीत सुरगाणा आणि बोरगाव ह्या उपकेंद्रांना १३२ के.व्ही. दिंडोरी उपकेंद्रातून वीज पुरवठा जोडण्यात आला आहे. १३२/३३  के.व्ही. वाहिनीचे अंतर ७५ ते ९० किमी असल्याने सुरगाणा येथे सतत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. परिणामी अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा मिळतो. कनाशी येथे १३२/३३ के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास कळवण तालुक्यातील दळवट, जयदर, चणकापुर व कनाशी तसेच परिसरातील भागात नियमित व अखंडित वीज पुरवठा करणे सोयीचे  होईल. तसेच कनाशी उपकेंद्र हे तीनही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी  असल्याने ३३ के.व्ही. वाहिन्याची लांबी मर्यादित राहील. त्यामुळे कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवाना नियमित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा होईल.

कनाशी नवीन येथे १३२/३३ के. व्ही. उपकेंद्र निर्मितीमुळे नेटवर्क मजबूत होण्यास आणि वीज प्रणालीतील बिघाड तसेच ओव्हर लोडिंग टाळण्यास मदत होणार असून कमी विद्युत दाबाच्या समस्या दूर होतील आणि ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळेल. कनाशी येथे लवकरच  वीज उपकेंद्र कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

00000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here