छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

0
12

सोलापूर, दि. 18 (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कुशल नेतृत्व, कर्तृत्व, संघटन हे गुण होते. तसेच प्रजाहितदक्ष, एक प्रखर योध्दा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी  आज येथे केले.

रंग भवन येथे छत्रपती संभाजी आरमारच्या वतीने आयोजित शिव रॅली व पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, राज्य उत्पादन शुल्कचे  उपविभागीय अधिकारी आदित्य पवार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, महापालिकेचे लक्ष्मीकांत चलवादी तसेच मान्यवर पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले,  छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर वरती स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली होती आणि त्यांच्या पराक्रमाने संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली आला. शिवरायांनी देशाला आदर्श निर्माण करून दिला. स्वतःचे आरमार, स्वतःचे सैन्य निर्माण केले. शिवरायांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. आज संपूर्ण भारत देशात विविध माध्यमातून छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचा गुण गौरव होत आहे. राज्य शासनाकडूनही राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज प्रशासनाचे, राज्यकर्त्याचे व समाजाचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले आहे. हे राष्ट्र निर्माण करताना शिवरायांनी सर्व समाजातील घटकांना न्याय दिला. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श दिला आहे, त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी केले.

छत्रपती संभाजी आरमारच्या वतीने आयोजित शिव रॅली व पालखी सोहळ्याची सुरुवात रंगभवन चौक ते  पार्क चौक मार्गे छत्रपती  शिवाजी चौका पर्यंत काढण्यात आली. यावेळी  जय जिजाऊ , जय शिवराय या जयघोषांनी संपूर्ण परिसर  दुमदुमला होता.

                                                                    000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here