राज्याचे आरोग्य जपण्यासाठी शासन कटीबध्द – पालकमंत्री मंत्री डॉ.तानाजी सावंत

उस्मानाबाद,दि.19(जिमाका): महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास देशात प्रथम क्रमाकांचा विभाग बनविण्याचा सरकारचा मानस आहे असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात नीति आयोगामार्फत मंजूर मोबाईल मिनी हॉस्पीटल (फिरते दवाखाना) च्या लोकार्पण सोहळा आणि वैद्यकीय मदत कक्ष कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.उज्जवला सरोदे-गवळी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील तांडे,वाड्या,वस्त्या, तसेच दुर्गम भागात राहणारे गरजू नागरिक आणि रुग्णांसाठी हे फिरेत दवाखाना वरदान आहे. यामुळे बाल मृत्यु,माता मृत्यू वेगवेगळे आजार आणि अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळीच उपचार देता येईल. या फिरत्या दवाखान्यात 120 प्रकारच्या चाचण्या,लहान-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येऊ शकतात तसेच या ठिकाणी रुग्णांसाठी चार बेडची सुविधा उपलब्ध असणारआहे. यापूर्वी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला  असून साडे चार कोटी माता व भगिनीच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.या उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेंतली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी मुंबईसह राज्यभरात  “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” ही योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळणार या मागे शासनाचा उद्देश सदृढ आणि निरोगी समाज निर्माण करणे आहे,असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.