स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. 20 : स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेतूनच राज्यासह देशातील उत्कृष्ट खेळाडू घडतील व आतंराष्टीय स्पर्धेत नाव लौकीक करतील. स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार असून  यातून आपले प्राविण्य सिध्द होईल व यशस्वीता खेचून आणता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

चिटणीस पार्क, महाल येथे आयोजित कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा समारोप व  बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी  धात्रक, नामदेव शिरगावकर ,सुधीर निंबाळकर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी राज्यातील विविध खो-खो संघटनेचे पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, संघटक यांना कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सन्मानित करण्यात आला. तदनंतर स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

पुरुष राखीव गटात प्रथम क्रमाक मुंबई उपनगर यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक पुणे संघानी पटकाविला. तृतीय स्थानी ठाणे जिल्हा राहिला. महिला राखीव गटात ठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक नाशिक संघाने पटकाविला. तृतीयस्थानी सांगली संघ राहिला.

मुलांच्या किशोर गटात प्रथम क्रमांक ठाणे जिल्हा तर द्वितीय क्रमांक उस्मानाबाद जिल्ह्याने पटकाविला. तृतीयस्थानी पुणे राहिला.  मुलींच्या किशोरी गटात प्रथम क्रमांक सांगली जिल्हा तर द्वितीय क्रमांक सोलापूर जिल्ह्याने पाटकाविला. तृतीयस्थानी कोल्हापूर जिल्हा राहिला.

पुरुष गटात  अष्टपैलु खेळाडू मुंबई उपनगरचा ओंकार सोनवने,  संरक्षक खेळाडू आदित्य गणफुले, पुणे तर मुंबई उपनगरचा हर्षद हातणकर आक्रमक खेळाडू पुरस्काराने सन्मानित, महिला गटात ठाणेची शितल भोर अष्टपैल खेळाडू तर नाशिकची वैजल निशा संरक्षक खेळाडू व ठाणेची दिव्या गायकवाड आक्रमक खेळाडू पुरस्काराने सन्मानित झाली.

मुलांच्या किशोर गटात अष्टपैलु खेळाडू आशिष गौतम तर संरक्षक खेळाडू जितेंद्र वसावे व ओंकार सावंत आक्रमक खेळाडू पुरस्काराने सन्मानित झाले. मुलींच्या किशोरी गटात सांगलीच्या अष्टपैलु खेळाडू विद्या लामखडे तर सोलापूरची समृध्दी सुरवसे आक्रमक खेळाडू व सांगलीची वैष्णवी चाके संरक्षक पुरस्काराने सन्मानित झाली.

  या स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह वाढावा यासाठी नुकतेच राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी सुध्दा या खो-खो स्पर्धेच्या खेळाडूंना भेट देवून प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांनी मानले.