मुंबई, दि. 22 : ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून 2023 हे वर्ष साजरे होत आहे. या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्यच्या फेब्रुवारी 2023 महिन्याच्या ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तृणधान्ये मानवी आरोग्यासाठी महत्त्वाची असून ज्वारी, बाजरी आणि इतर भरड धान्यांची सर्वांगीण माहिती, महत्त्वाच्या पिकांची लागवड, विविध वाण, विविध खाद्यान्न, आहारातील महत्त्व, प्रक्रिया उद्योग, पौष्टिकता आणि भविष्यातील वाव, महाराष्ट्र मिलेट मिशन आदी विषयांवरील संशोधक आणि तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. यासोबतच ‘पर्यटन विशेष’ हा स्वतंत्र विभाग समाविष्ट केला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, पर्यटन विभागाच्या योजना, याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.
हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच http://mahasamvad.in/?p=89094 येथे वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.