भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ

समाजातील सर्वसामान्य, दुर्बल, वंचित व तळागाळातील मागासवर्गीय घटकांचा विकास व्हावा, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या अनेक योजना मागासवर्गीय घटकांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होण्याकरिता या घटकास समृध्द करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. त्यातीलच एक भारत सरकार शिष्यवृत्ती योजना. या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ मिळताना दिसत आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून भारत सरकार शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो.

याबाबत शासन स्तरावरुन भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षि छत्रपत्ती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी निर्वाह भत्ता या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येतात, असे सांगून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कैलास आढे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, या योजनांमधून महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सन 2021-22 मध्ये अनुसूचित जातीच्या 14 हजार, 595 विद्यार्थ्यांना 45 कोटी 55 लाख रुपये रक्कम वितरीत करण्यात आली. तर विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील 33 हजार 584 विद्यार्थ्यांना 89 कोटी, 93 लाख रूपये रक्कम वितरीत करण्यात आली. अशा तऱ्हेने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती,  भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रतीवर्षी अंदाजे 50 हजार विद्यार्थ्यांना रक्कम रुपये 135 कोटी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांच्या खात्यावर वितरीत करण्यात आली आहे.

याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहात आहेत. सोलापूरच्या ए.जी. पाटील इन्स्ट‍िट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये क्रांती रावसाहेब रामगुडे ही विद्यार्थिनी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या व्दितीय वर्षात शिकते. तिला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला असून, याबाबत तिने विभागाचे ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत. क्रांती म्हणाली, ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे, त्यांच्यासाठी हे खूप मोठे आर्थिक साहाय्य आहे. त्यामुळे अनेक मागासवर्गीय व अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करु शकतात. या शिष्यवृत्तीमुळे माझ्याही जीवनात खूप बदल झाला असून त्यासाठी मी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची खूप आभारी आहे.

अनिकेत नागेशकुमार बोराडे हा डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयामध्ये एम. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो म्हणाला, माझ्या शिक्षणात समाजकल्याण विभागाचा मोठा वाटा आहे, कारण मला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे मी आज माझे शिक्षण पूर्ण करू शकत आहे. माझे भाऊही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे चांगले शिक्षण घेऊन शकले व आज चांगल्या पदावर काम करत आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाज कल्याण विभागाचा खूप मोठा वाटा आहे.

एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरिता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमुळे शैक्षणिक बळ मिळाले आहे. 

-संप्रदा बीडकर,

जिल्हा माहिती अधिकारी,

सोलापूर 

00000