विधानसभा प्रश्नोत्तरे

0
9

रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरच करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 2 : दोन वर्षांपूर्वी जुलै – 2021 च्या अतिवृष्टीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट रस्ता बंद असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ओणी – अणुस्कुरा घाट या मार्गावर वळविण्यात आल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

ओणी – अणुस्कुरा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य राजन साळवी, भास्कर जाधव, योगेश कदम, नितेश राणे, संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे पावसाळ्यात खड्डे पडले होते. या रस्त्यावरील खड्डे देखभाल दुरुस्ती कामांतर्गत भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. याशिवाय काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम प्रगतीवर आहे. उर्वरित कामांसाठी या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी मारहाण प्रकरणी कारवाई करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 2 :  “के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरासाठी गेले असता प्राध्यापकाने मारहाण केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची चौकशी तातडीने चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, ॲड. आशिष शेलार, धनंजय मुंडे यांनी याबाबत विधानसभेत  प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले की, सदर  प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या तीन सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. तसेच या प्राध्यापकावर व्यवस्थापन समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यापीठाने केलेल्या कारवाईचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

मुंबई, दि. 2 : पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री भीमराव तापकीर, प्रकाश आबिटकर, योगेश सागर, सुभाष धोटे, हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत  मांडला होता.

श्री. चव्हाण म्हणाले की, पुण्यातील रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. रस्त्याचे काम सुरू असताना वेळोवेळी ऑडिटसुद्धा करण्यात येईल. या कामाला अधिक गती देण्यासाठी आणि अडचणी समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच एकत्र बैठक घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून कालमर्यादित काम पूर्ण करण्यात येईल.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

गडचिरोली जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 2 : गडचिरोली जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याची  घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत केली.

गडचिरोली जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा मिळण्याबाबत विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम, अशोक चव्हाण, नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, वनपट्टेधारक शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत  तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here