बोंडारवाडी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ :  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेतीसाठी बोंडारवाडी प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पात एक टीएमसी जलसाठा करण्याची मागणी येत आहे. या मागणीनुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणाअंती शक्य असलेल्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

विधान भवनात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बोंडारवाडी प्रकल्प आणि सातारा तालुक्यातील लावंघर उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला आमदार शिवेंद्रराजे भोसले, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदींसह अन्य अधिकारी आणि बोंडारवाडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी निधीची तातडीने तरतूद करण्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सर्वेक्षणानंतर कार्यपद्धती ठरवून प्रकल्पाचे काम तत्काळ पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी निधी  उपलब्ध करून देण्यात येईल. लावंघर उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी धोरण ठरवावे. याबाबत  यंत्रणांनी कार्यवाही करावी. बैठकीला जलसंपदा विभाग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व प्रकल्पासंबंधीत शेतकरी  उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/स.सं/