मुंबई, दि. 2 : गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या सन २०२२ -२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आल्या.
या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत सदस्यांनी सूचना केल्या. या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षकांना एका वर्षात 20 दिवस नैमित्तिक रजा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे. याबाबत ३ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/