मुंबई, दि. 3 : मुलुंड आणि ठाणे येथे उद्या शनिवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध आस्थापनांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी, नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुलुंड (पूर्व) येथे शासकीय आयटीआय, मिठागर रोड, ठाकुरवाडी येथे तर ठाणे (पश्चिम) येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चिंतामणी चौक, जांभळी नाका येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध उद्योग, कॉर्पोरेट कंपन्या, आस्थापनांसह शासनाची विविध आर्थिक विकास मंडळेही सहभागी होणार असून त्यांच्याकडील स्वयंरोजगारविषयक विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, मुलाखत कशी द्यावी, बायोडाटा कसा लिहावा आदी विविध विषयांवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ॲप्रेंटीसशिप करु इच्छिणाऱ्या युवकांनाही या मेळाव्यात संधी मिळणार आहे.
०००
इरशाद बागवान/विसंअ/