मुंबई, दि.6 : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक हरपले, ’ अशा शब्दांत क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
मंत्री श्री महाजन आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘करमरकर मूळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलानेसुद्धा डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत करमरकरांनी पत्रकारितेची वेगळी वाट निवडली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू पुढे जायला हवे, जे कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खोखो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. खो खो संस्था, कार्यकर्ते यांना आधार दिला. परिणामी खेळ मोठा होत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. बँका, रेल्वेची खोखो खेळाडूंना दारे उघडली गेली! दुसऱ्या बाजूला सिझन क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची असल्यास त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. परिणामी टेनिस क्रिकेटला महत्त्व देता कामा नये, यामुळे युवा खेळाडूंचा वेळ, मेहनत वाया जाते. यातून हाती काही लागत नाही. म्हणून त्यांनी कधीच टेनिस क्रिकेटचा फोटो सोडाच, सिंगल बातमी सुद्धा लावली नाही.
क्रीडा पत्रकार हा मैदानावर फिरता असला पाहिजे, याचा आदर्श त्यांनी स्वतः दिवसाचे अनेक तास खर्च करत इतरांसमोर ठेवला. यामुळे करमरकर यांच्या लेखणीला धार होती. प्रसंगी कौतुक करताना त्यांची लेखणी प्रचंड टोकदार होत असे. यातून मग कोणाची सुटका नसे! खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला होता, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, ‘असे श्री. महाजन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0000
राजू धोत्रे/वि.स.अ