ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. ६ :- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. ऑस्ट्रेलियातील उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळही यावेळी उपस्थित होते. यावेळी अर्थ, उद्योग, कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्रही खूप मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. या क्षेत्रातील संधींचाही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची उभारणी करण्यासंदर्भात शक्यता पडताळून पाहता येईल. त्यादृष्टीनेही सर्वेक्षण करण्यात यावे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबोट म्हणाले, ऑस्ट्रेलियासाठी भारतासोबतची मैत्री महत्त्वाची आहे. दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध मजबूत करण्यास वाव असून विशेषत: ऊर्जा क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

—–000—–