विधानसभा लक्षवेधी

0
7

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक  उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई दि. 8 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी करार व कंत्राटी पद्धतीवर आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून अधिवेशन काळात याबाबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून कायम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात पाच वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे शक्य नसल्याने सध्या कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मानधन वाढीबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबई, दि. 8 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

नाशिक महानगरपालिकेच्या भूमापन प्रक्रियेत मातंग समाजाच्या जागेसंदर्भातील बदलाबाबत लवकरच निर्णय – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील सर्व्हे नंबर 491 (फायनल भूमापन क्रमांक 251) नगर रचना योजना भाग – एक ही जागा अनेक वर्षापासून मातंग समाजाची होती. या जागेचा सातबारा देखील या समाजबांधवांच्या नावावर होता. परंतु भूमापन प्रक्रियेत बदल झाल्याचे निदर्शनास आल्याने यात अंशत: बदल करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री. सामंत म्हणाले, या जागेच्या आरक्षणात झालेला बदलाबाबत लवकरच निर्णय घेऊन ही जागा मातंग समाजाच्या  नावावर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 8 : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते जालना हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय कुटे, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.

या प्रकल्पाबाबतचा विकास आराखडा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाने या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्यानंतर राज्याच्या हिस्स्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

00000

शैलजा पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here