महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
5

मुंबई, दि. ८:- आज सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत महिला पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणी चोख कर्तव्य बजावत असतात. पोलीस महिला कर्मचाऱ्यांसाठी ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळ प्रांगणात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी अर्थसंकल्पातदेखील राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असून महिला पोलिसांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानकात हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. फडणवीस यांनीही महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तृत्वाबाबत गौरवोद्गार काढले.

यावेळी उपस्थित महिला पोलीस अधिकारी यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here