नागपूर विभागाने देशात अव्वल येण्यासाठी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करावी –    विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर दि. 10 मार्च : नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी महाआवास योजनेंतर्गत नागपूर विभागाने आतापर्यंत 78 टक्के उद्दिष्टपूर्ती करून राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. यापुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करून अव्वल येण्यासाठी  घरकुल बांधकामाची 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करून अजून चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केली.

            महाआवास अभियानांतर्गत 2021-22 च्या विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त बिदरी बोलत होत्या. भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, गडचिरोलीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, गोंदियाच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

            आयक्त बिदरी यांनी पुढे सांगितले की लाभार्थ्याच्या नावे जमीन नसल्याकारणाने  प्रलंबित घरकुलाची कामे मार्गी लावण्यात यावी, यासाठी संबंधीत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी वापरात नसलेल्या शासकीय जमीनीची शिफारस करून जमीन नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळविणाऱ्या जिल्हा व ग्रामपंचायतींचे त्यांनी अभिनंदन केले.

उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून महाआवास योजनेबाबत व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची माहिती दिली.

            यप्रसंगी महाआवास अभियानांतर्गत 2021-22 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना आयुक्त बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत दोन्ही योजनेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकासाठी भंडारा जिल्ह्याची  निवड करण्यात आली.  तसेच दोन्ही योजनेत तालुकास्तरावरील प्रथम तीन क्रमांक भंडारा जिल्ह्याने मिळवून अव्वल कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार स्विकारला.

जिल्हास्तरावर केंद्र पुरस्कृत योजनेत द्वितीय क्रमांक गोंदिया तर तृतीत क्रमांकासाठी गडचिरोला पुरस्कार देण्यात आला. तर राज्य पुरस्कृत योजनेत गडचिरोली ‍ जिल्ह्याला द्वितीय आणि  चंद्रपूरला तृतीत पुरस्कार देण्यात आले.  सर्वोत्कृष्ट तीन तालुक्यांसाठी केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व मोहाडी तर राज्य पुरस्कृत योजनेत लाखनी, पवनी व भंडारा या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींसाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत  वडाळा ता. आष्टी, सिंदीविहीरी  ता. कारंजा व दारोडा ता. हिंगणघाट  या वर्धा जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आला. तसेच राज्य पुरस्कृत योजनेत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमधील धामनगाव व सेलू पंचायत समितीमधील सालईपेवठा तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड पंचायत समितीमधील मोहाडी  या ग्रामपंचायतींची प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानासाठी निवड करण्यात आली. शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन तालुक्यांनाही पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात केंद्र पुरस्कृत योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व अहेरी आणि गोंदिया तालुक्याची निवड करण्यात आली तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत गडचिरोलीच्या देसाईगंज व गोंदियाच्या तिरोडा व सालेकसा या तालुक्यांची निवड करण्यात आली. यावेळी संबंधीत प्रतिनिधींनी  पुरस्कार स्विकारले.

यासोबतच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2018-19 करीता निवड झालेल्या संस्थांनाही आयुक्त बिदरी यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. यात नागपूरच्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्राम पंचायतीला प्रथम क्रमांकासाठी 10 लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. गोंदियाच्या शिरेगावबांध व भागी या ग्रामपंचायतींना संयुक्तपणे द्वितीय पुरस्कार रुपये चार लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच तृतीय पुरस्कार नागपूरच्या चिकना व चंद्रपूरमधील आष्टा या ग्रामपंचायतींना संयुक्तपणे देण्यात आला.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन दिनेश मासोदकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहायक आयुक्त स्वाती इसाये यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विभागातील उपायुक्त, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक,  गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.