बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्रासाठी सल्लागार समिती नेमणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0
11

मुंबई, दि. 13 : ज्येष्ठ विधिज्ञ प्रा.बाळासाहेब आपटे यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात यावी अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. याबाबत मंत्री श्री.पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुनिल भिरूड व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            बाळासाहेब आपटे यांचे शिक्षण विषयक, विद्यार्थी विषयक कायदा क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याची माहिती व्हावी तसेच नव्या पिढीला त्यातून शिकता यावे यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. जून पासून यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे निर्देशही यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

            अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बाळासाहेब आपटे यांच्यासमवेत काम केलेल्या वरिष्ठ सहकाऱ्यांसह शिक्षण क्षेत्रीतील अभ्यासकांना या सल्लागार समितीमधे घेण्यात यावे आणि सर्वंकष असा अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या अध्यासनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून निधीची उपलब्धताही झाली आहे. या अध्यासनासाठी  पदांची निर्मितीही करण्यात येत आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

            बाळासाहेब आपटे हे द्रष्टे समाज कार्यकर्ते होते. राष्ट्र निर्मीतीत युवकांच्या योगदानासाठी त्यांनी नेहमी प्रेरित केले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.

००००

अर्चना शंभरकर/विंसअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here