मुंबई, दि. १४ : राज्यात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेत प्रथम क्रमांकावर गोंदिया, तर दुसऱ्या क्रमांकावर पालघर जिल्हा आहे. मुंबई शहर जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ई- श्रम पोर्टलवरील असंघटित कामगारांची नोंदणी वाढवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुंबई शहर जिल्हास्तरीय असंघटित कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विनोद सिंह, उपमुख्य अभियंता एम. बी. असवाल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुलभा शेलार, नागरी सुविधा केंद्राचे जिल्हा समन्वयक मनवेल वळवी, समाज कल्याण विभागाचे सहायक निरीक्षक एस.ए. सावंत, सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे, कामगार अधिकारी स्वरा गुरव, सर्व श्रमिक संघटनेचे प्रतिनिधी संतोष विभुते उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत म्हणाले की, असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल विकसित केले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांनी यावर नोंदणी केल्यास कामगारांना भारतमान्य ई-श्रम कार्ड मिळणार आहे. या ई- श्रम कार्डच्या माध्यमातून शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. तसेच या पोर्टलवर नोंदणी केल्याने स्थलांतरीत कामगारांची माहिती ठेवणे सुलभ होणार आहे. प्राप्त माहितीचा वापर असंघटित कामगारांच्या हितासाठीच्या योजना बनविण्यासाठी होणार आहे. त्या अनुषंगाने अद्यापही ज्या कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अशा कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी केले.
000
जयश्री कोल्हे/स.सं