मुंबई, दि. १४ : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा या महानाट्यातून शिवकाळ जिवंत केला आहे. हे महानाट्य पहात असताना आपण शिवकाळात जगत असण्याचा अनुभव येतो. जाणता राजा हे महानाट्य पाहायला मिळणे ही सर्वांसाठी एक पर्वणीच आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठाण, पुणे निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग १९ मार्च २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. या महानाट्याच्या आजच्या पहिल्या प्रयोगाची सुरुवात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी रंगमंचावर आमदार ॲड. आशिष शेलार, इस्रायल देशाचे कौन्सिल जनरल कोब्बी शोशानी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांची फौज उभारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग शिवरायांनी प्रेरित केले. शिवछत्रपती महाराजांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र व भारत पुढे जात आहे. शिवछत्रपतींचे मावळे होवून आपण काम करूया असेही ते यावेळी म्हणाले.
या महानाट्याची सुरुवात विधिवत पूजेने झाली. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. प्रयोगाच्या शुभारंभाला लोकप्रतिनिधी, महनाट्याचे कलाकार व चमू उपस्थित होती.
०००
निलेश तायडे/स.सं