विधानसभा प्रश्नोत्तरे

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 15 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यावर्षी म्हणजेच 2022-23  मध्ये 33 हजार 774 अर्ज प्राप्त झाले असून यासाठी 184 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य राजेश एकडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अशोक चव्हाण,  छगन भुजबळ यांनी विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेपासून वंचित असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून 1 हजार 178 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 1 हजार 94 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र होते. पात्र अर्जापैकी आतापर्यंत 912 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला गेला असून उर्वरित 182 विद्यार्थ्यांना 31 मार्च पूर्वी या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत सांगितले.

000

वर्षा आंधळे/विसंअ/15.03.2023

 

तांदळाचा अनधिकृत साठा सापडल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 15 : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य शिरीष चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवलेला 6 लाख 70 हजार 150 रुपये किमतीच्या 729 गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी 16 डिसेंबर रोजी दोषींवर कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी आणखी काही लिंक आहे का हे तपासून घेण्यात येत आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.

000

वर्षा आंधळे/विसंअ/15.03.2023

 

ट्रान्सफॉर्मर्स तत्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 15 : नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर्स तत्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, संजय कुटे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, प्राजक्त तनपुरे यांनी विजपुरवठ्याअभावी पीकांचे होत असलेले नुकसान याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

श्री.फडणवीस म्हणाले की, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर्सचा पूल तयार करण्यात येईल. आज प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवर लोड आल्याने ट्रान्सफॉर्मर जळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ट्रान्सफॉर्मरसाठी रिप्लेस आणि रिपेअर असे धोरण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात व्हेंडर बेस निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मदत घेण्यात येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत नुकतीच एक प्रीबीड बैठक झाली आहे. दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने काही वेगळे उपाय करता येतील का, याबाबतही विचार करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन 2025 पर्यंत 50 टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सध्या 15 लाख 23 हजार 426 ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज देयक गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये  भरलेले नाही. त्यांना थकीत देयके भरा अशा सूचना नाहीत तर चालू बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

रब्बी हंगामात कृषी वाहिन्यांमधील भार वाढून महत्तम मागणीच्या कालावधीत काही वेळेसाठी सदर वाहिन्या अतिभारीत होतात आणि तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होतो. सदर तांत्रिक बिघाड दूर करुन, नादुरुस्त रोहित्र बदली करुन वीज पुरवठा कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्यात येतो. अजंग उपकेंद्राची स्थापित क्षमता 10 एमव्हीए असून तेथील अतिभारीत वाहिन्यांवरील भार कमी होण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS)अंतर्गत अतिरिक्त 5 एमव्हीए क्षमतेचे ऊर्जा रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

वर्षा आंधळे/विसंअ/15.03.2023

 

गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 15 : गडचिरोली येथील सुरजागड येथील गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी संबंधित विधानसभा सदस्य यांच्यासह करण्यात येईल, असे  बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनिल केदार व सुभाष धोटे यांनी कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. भुसे म्हणाले की, सदर कंपनीच्या नावाने वाटप करण्यात आलेल्या कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलण्यात आल्याने नुकसान झाले असल्याची बाब खरी नाही. मात्र संबंधित विधानसभा सदस्य यांना या प्लान्टबाबत काही शंका असल्यास या प्लान्टची संयुक्त पाहणी करण्यात येईल.

000

वर्षा आंधळे/विसंअ/15.03.2023