विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
6

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची

सुधारणासह स्वच्छता करणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. भुसे म्हणाले की,  एस. टी.च्या वाहक आणि चालकांना रात्री बस मुक्कामी गेल्यानंतर तेथे विश्रांतीसाठी असणारी सुविधा अतिशय अपुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील आणि तातडीने तिथे सुधारणा करण्यात येईल.

सध्याच्या परिस्थितीत वाहक आणि चालकांना मिळणाऱ्या रात्रीच्या वस्ती भत्त्यात  सन 2018 मध्ये वाढ करण्यात आली आहे.  गावपातळीवर 75 रुपये, जिल्हा पातळीवर 90 रुपये आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात रात्रीचा वस्ती भत्ता 100 रुपये इतका देण्यात येत आहे. अधिकृत संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून त्यात जसे ठरेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सध्या एस. टी.च्या वतीने 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत, महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विविध विभागांकडून एस. टी.ला विविध सवलतीपोटी देण्यात  येणारी रक्कम वेळेत मिळण्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांच्यासह श्रीमती मनीषा कायंदे, श्रीमती उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/15.03.2023

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच

भरणार – मंत्री गुलाबराव पाटील

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक होऊन  शासकीय अधिकारी,कर्मचारी अनेक वर्षे कार्यरत होते. मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना अधिसंख्य पदावर नेमण्यात आले आहे. या नेमणुकीनंतर रिक्त झालेल्या जागा लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

 

राज्यातील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना अधिसंख्य पदाचा

पदभार दिल्यासंबंधी सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जमातीच्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
यावेळी सदस्य विक्रम काळे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये आवश्यक

सोयी-सुविधा देणार – मंत्री संजय राठोड

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्रंथालय, संगणक कक्ष, जेवण, स्वच्छता गृह, सीसीटीव्ही अशा विविध सुविधा असणे अपेक्षित आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन राज्यातील ४४१ शासकीय वसतिगृहांची तत्काळ तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत ४९ वसतिगृहांतील गृहपालांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय वसतिगृहांमध्ये अनियमितता झाल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहात ३ हजार ३५८ विद्यार्थी असून, त्यांना विविध सोयी सुविधा देण्यात येतात. मात्र, प्राप्त तक्रारीनुसार ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ वसतिगृहांत तक्रारीत तथ्य आढळून आले. सर्व गृहपालांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू आहे, तर पाच गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. या वसतीगृहांतील भोजन ठेकेदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य इत्यादी अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ज्या तालुक्यात वसतिगृहांची आवश्यकता आहे तेथे नव्याने वसतिगृह उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना असून, याअंतर्गत वसतिगृहाप्रमाणेच सोयी सुविधा देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य निरंजन डावखरे, अभिजित वंजारी, अनिकेत तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

 मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा

लवकरच अंतिम करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी प्राप्त सूचना व सुधारणा यांचा विचार करून सल्लागारामार्फत संकल्पनात्मक बृहद आराखडा प्राधिकरणास दोन पर्यायासह सादर करण्यात आला आहे. लवकरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई विद्यापीठामार्फत संकल्पचित्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत डीडीएफ मेसर्स यांना सल्लागार म्हणून नेमले होते. १ कोटी १२ लक्ष ७० हजार इतक्या रकमेच्या कामाचा करारनामा केला आहे. अद्यापपर्यंत पाच लक्ष रूपयेच अदा करण्यात आले आहेत. ॲकॅडमिक ब्लॉकसाठी ३० टक्के, प्रशासकीय ब्लॉकसाठी १० टक्के, खेळासाठी १८ टक्के, विद्यार्थी निवासी करिता १० टक्के, संशोधनाकरिता १२ टक्के,  शिक्षक निवासासाठी ५ टक्के, रस्ते आणि इतर वापराकरता १५ टक्के असा एकूण १०० टक्के विनियोग दाखविण्यात आला आहे. मात्र, सल्लागारामार्फत दिलेल्या दोन पर्यायांपैकी एका पर्यायास विद्यापीठाने अद्याप संमती दिली नसल्याने विलंब झाला आहे. मात्र, लवकरच यासंदर्भात मंत्री स्तरावर बैठक घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मंजुरीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार – मंत्री दीपक केसरकर

 

चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्राचा कृती आराखडा चंद्रपूर महानगरपालिकेने तयार केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

येत्या रविवारी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात चंद्रपूर शहराच्या विषयावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोळसा वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण खूप होते.  त्यामुळे बंदिस्त कंटेनरमधून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपूर शहराच्या लगत एमआयडीसी, सिमेंट कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्रांचा एकत्रित कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य सचिन अहिर आणि सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला.

०००

दीपक चव्हाण/वि.सं.अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here