‘पीएमएफएमई’चा मिळाला आधार, व्यवसायाचे स्वप्न झाले साकार

नशीब हे तळहाताच्या रेषांवर नाही तर मनगटाच्या ताकदीवर अवलंबून असते या उक्तीनुसार पलूस तालुक्यातील कुंडल येथील दिपाली बाबासाहेब पवार यांनी ज्योतिर्लिंग महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये उद्योजक होण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण उत्पादने Local For Vocal या योजनेप्रमाणे नवीन उत्पादन निर्मितीचा ध्यास घेऊन कृषी विभागाच्या  पीएमएफएमई योजनेचा लाभ घेऊन स्वाद मसाले या उद्योगाची उभारणी केली.

स्वाद मसाले या आपल्या उद्योग व्यवसायाबाबत माहिती देताना दिपाली पवार यांनी सांगितले, ग्रामीण भागातील महिला मोलमजुरीवर आपली उपजीविका चालवितात. मोलमजुरीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न यामध्ये त्यांची आर्थिक ओढाताण होते. या महिला सक्षम व्हाव्यात, त्यांना रोजगार मिळावा हा ध्यास घेऊन आसपासच्या महिलांना एकत्र करून ज्योतिर्लिंग महिला बचत गटाची स्थापना केली. या महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज घेऊन गाई-म्हैशी विकत घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. शेळीपालन, पिठाची गिरणी, उन्हाळी पदार्थ बनविण्याचे काम सुरू केले. महिला बचत गटामार्फत तयार केलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी आम्ही सर्व महिलांनी 2016 साली स्वाद मसाले या उद्योगाची उभारणी केली.

यामध्ये सन 2016 पासून आत्तापर्यंत साधारण 300 महिला काम करीत असून स्वत:चे  उत्पादन करून आपल्या संसाराला हातभार लावतात. या महिलांच्या उत्पादनाला देश पातळीवर व आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा ध्येय असून यासाठी महिलांना ग्राहकाबद्दल त्याच्या आवडीबद्दल जागृती केली जाते. आपल्या उत्पादनाबद्दल प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम स्वाद मसाले सातत्याने करत आहे. त्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवणे व स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा करणे हेही काम सातत्याने सुरू आहे.

या उद्योगामध्ये शेतकऱ्यांकडून मिरची व हळद हा कच्चा माल घेवून त्यापासून मिरची पावडर व हळद पावडर बनविण्यासाठी प्रोसेस मशिनरी व पॅकेजिंग मशिनरी इत्यादीचा प्रस्ताव कृषी  विभागाकडे सादर केला. या व्यवसायाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, सांगली यांनी पीएमएफएमई योजनेतून मदत केल्याने स्वाद मसाले मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होवू लागले. या उद्योग व्यवसायातील 300 महिलांना त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 12 जानेवारी 2023 रोजी दुबई येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भाग घेऊन आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी एक पाऊल टाकले. उत्पादनातील दर्जेदारपणा व गुणवत्ता या जोरावर या उद्योग व्यवसायाने विविध पुरस्कारही मिळविले असून उद्योगाची  वार्षिक ५ कोटी रूपयांची उलाढाल आहे. यामधून महिलांना चांगला फायदा मिळत असल्याचे श्रीमती पवार यांनी  सांगितले.

ज्योतिर्लिंग महिला बचत गटामार्फत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी  उद्योग समूह मुख्य  भूमिका बजावत असून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काम करीत आहे, याचा मनस्वी आनंदही होतो, असे मत दिपाली पवार यांनी या उद्योगाची माहिती देताना व्यक्त केले.

 

जिल्हा माहिती कार्यालय, सांगली