विधानपरिषद लक्षवेधी

0
4

तलावाच्या बॅकवॉटरमुळे बाधित जमिनीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मोबदला देणार – मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

मुंबई, दि. 15 : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील तलाववाडी शिवारातील तलाव पूर्णपणे पाण्याने भरल्यानंतर बॅक वॉटर मुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होते. याबाबत एक महिन्याच्या आत सर्वेक्षण, जमिनीची मोजणी आणि आवश्यकता असल्यास अतिरिक्त भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच तीन महिन्यांच्या आत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल, असे मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील तलाववाडी शिवारात 133 एकर क्षेत्रात असलेल्या शिवकालीन तलावाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत आणि बाधित क्षेत्राच्या भूसंपादनाबाबत सदस्य सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना प्रा.डॉ. सावंत बोलत होते.

यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, हा तलाव पुरातन असून पूर्ण रितीने भरल्यानंतर किमान 50 शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राची मोजणी उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक असलेल्या अतिरिक्त भू संपादनाची कार्यवाही पूर्ण करून संबंधितांना मोबदला अदा करण्यात येईल, असेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.

00000

मनिषा पिंगळे/विसंअ

 

‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. 15 : अनुसूचित जाती प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत फेलोशिप देऊन संशोधनास चालना देण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातून 200 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्व बाबी तपासून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

‘बार्टी’मार्फत पात्र सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी या अनुषंगाने सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री.राठोड यांनी ही माहिती दिली.

मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले की ‘बार्टी’ने 2013 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती सुरु केली आहे. याबरोबरच विविध योजना आणि कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येत आहेत. सारथी आणि महाज्योती या संस्थांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना एम फिल व पी एच डी करीता अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. याचधर्तीवर ‘बार्टी’ ने सर्व पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी होत आहे. या बाबत बार्टीने शासनास प्रस्ताव सादर केला आहे.

याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

अधिछात्रवृत्ती पात्र विद्यार्थ्यांकडून प्रबंध अप्राप्त असल्याचे लक्षात आले आहे. या अनुषंगाने ऑनलाईन निरीक्षण (मॉनिटरिंग) करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

–0000000—

मनिषा पिंगळे/विसंअ

 

लिपिकवर्गीय संवर्गातील भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम देण्याची मुभा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सात हजार 34 पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रमानुसार एक किंवा अनेक नियुक्ती प्राधिकारी देण्याची मुभा असणार आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘ब’ व ‘क’ संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील गट ‘क’ च्या भरती अनुषंगाने सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देतांना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, राज्य शासकीय कार्यालयातील गट- ‘क’ मधील लिपिकवर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामधील प्रथम टप्प्यात लिपिक-टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अराजपत्रित गट-‘ब’ व गट-‘क’ संवर्गातील एकूण ८ हजार १६९ पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ८ हजार १६९ पदांमध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गाची ७ हजार ३४ पदे अंतर्भूत आहेत. प्रस्तूत जाहिरातीस अनुसरुन एकूण ४ लाख ६६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी एकूण २८१ नियुक्ती प्राधिकारी निश्चित केले आहेत.

उमेदवारांना अर्ज सादर करतांना पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. तसेच अंतिम शिफारस यादी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार नियुक्ती प्राधिकारीनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल भागातील उमेदवारांनासुद्धा त्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांच्या पसंतीच्या कार्यालयात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.  या तरतुदीमुळे कोणताही उमेदवार अपात्र ठरणार नाही असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

००००

मनिषा पिंगळे/विसंअ

 

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १५ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल असे मंत्री श्री.लोढा म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती ठेवण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल.

राज्यात २०० कोटी रुपयांचा नाविन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी, तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या संदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दटके, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

मुंबईतील स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशिन्स बसविणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १५ : मुंबई शहरात असलेल्या ८ हजार १७३ स्वच्छतागृहांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटीक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि इन्सिनेरेटर मशीन बसविण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. संबंधित पुरवठादारांशी संबंधित सर्व बाबी निविदा समितीने तपासल्या असून या कामी अनियमितता झाली नसल्याचे ते म्हणाले.

सदस्य ॲड. अनिल परब यांनी या मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री.देसाई म्हणाले, शहरातील सर्व महिलांची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यादृष्टीने स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकीन बसविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ पर्यंत प्राप्त होतील, अशा रितीने निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यास केवळ दोन निविदाधारकांचा प्रतिसाद मिळाल्याने त्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्राप्त निविदांमधून लघुत्तम निविदाकाराचा ७६,५२८ हा रास्त व वाजवी दर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहांच्या व्यतिरिक्त इतर स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा अशा मशिन्स बसविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उप प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बृहन्मुंबईतील स्वच्छतागृहांच्या संख्येबाबत विसंगती दिसून येत असल्याने महानगरपालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत २० तारखेला बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले. त्यावर अशी बैठक घेण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here