विधानसभा प्रश्नोत्तरे

बँकेत बेकायदा खाते उघडल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 17 : सर ज. जी. समूह रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बँकेत बेकायदा खाती उघडली होती. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने चौकशी केली आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

सदस्य सुनील प्रभू, भास्कर जाधव यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मयूर साळवी यांनी या प्रकरणी लेखी तक्रार वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता सर ज.जी. समूह रुग्णालयातील 11 विभागांच्या प्रमुखांनी विभागाच्या नावे कोणतीही परवानगी न घेता बँकामध्ये स्वतंत्र खाते उघडल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बँक खात्यामध्ये जवळपास 6 कोटी रुपये जमा असल्याचे दिसून आले होते. यातील पैसे हे प्रामुख्याने परदेश वारी, परदेशातील हॉटेलिंग किंवा परवानगी न घेता वैद्यकीय उपकरणांची खरेदी यासाठी वापरले गेले होते. ही अंत्यत गंभीर बाब आहे. यापैकी 2 कोटी 75 लाख रुपये खर्च झाले असून आता उर्वरित रक्कम कोषागारात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

000

नर्सिंग होम परवाना नूतनीकरणासंदर्भात रुग्णालयांची चौकशी करणार  सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत

मुंबई, दि. 17 : पुणे शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे. नर्सिंग होम परवाना नूतनीकरण न केलेल्या रुग्णालयांची चौकशी करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले.

सदस्य माधुरी मिसाळ, राम सातपुते, राम कदम यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, खासगी रुग्णालयांनी साधारणपणे रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. अनेक रुग्णालये हा नियम पाळताना दिसत नाही. नूतनीकरण परवानावेळी ही बाब तपासून घेण्यात येईल. यासंदर्भात अधिवेशनकाळात धर्मादाय आयुक्तांसह बैठक घेण्यात येईल.

पुण्यातील एकूण 56 रुग्णालयांनी नर्सिंग होम परवाना नूतनीकरण केलेले नाही त्यांना परवाना नूतनीकरण करुन घेण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता 56 पैकी 40 रुग्णालये बंद असल्याचे आढळून आले आहे. 7 रुग्णालयांचे नूतनीकरण करण्यात आले आहे, तर 9 रुग्णालयांच्या नूतनीकरणाची कार्यवाही सुरु असल्याचे मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

000

आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री डॉ.तानाजी सावंत

मुंबई, दि. 17 : राज्यातील आशा सेविकांना दर महिना 6 हजार 500 मानधन देण्यात येते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात यामध्ये 1 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

सदस्य नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, प्रा. वर्षा गायकवाड, राहुल कुल, बळवंत वानखेडे यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आशा सेविकांना केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत 60:40 या प्रमाणात मानधन देण्यात येते. याशिवाय 56 वर्गवारीत कामावर आधारित मोबदला देण्यात येतो. तो साधारणपणे 200 ते 3000 रुपयांपर्यंतचा असतो. याशिवाय विमा कवच आणि इतर अनुषंगिक लाभ देण्यात येतात. सध्या गट प्रवर्तकाला 1500 रुपये आणि आशा सेविकांना 100 रुपये मोबाईल रिचार्जसाठी देण्यात येत आहेत. आशा सेविकांना 100 रुपये देण्यात येणाऱ्या मोबाईल रिचार्जच्या मोबदल्यात वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

000

रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाई आराखड्याबाबत अधिवेशनापूर्वी बैठक घेणार  मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 17 : रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईबाबत करावयाच्या उपाययोजना आणि पाणीपुरवण्यासंदर्भात विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य भास्कर जाधव, आदिती तटकरे यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, रत्नागिरी येथील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आतापर्यंत करण्यात आलेली कार्यवाहीची माहिती पटलावर ठेवण्यात येईल. अधिवेशनादरम्यान घेण्यात येणाऱ्या बैठकीत विस्तृतपणे मे महिन्यापर्यंत पूर्ण करावयाची कार्यवाही याबाबतच्या सूचना विभागाला देण्यात येतील.

००००

वर्षा आंधळे/विसंअ