शेगाव विकास आराखड्यातील कामे प्रशंसनीय – विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे

बुलडाणा, दि. १८ : शेगाव विकास आराखड्यातील कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करण्यात आली आहे. इतर आराखडे राबविताना याचा निश्चित लाभ होणार आहे, असे मत विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी व्यक्त केले.
शेगाव येथील विश्रामगृहात विकास आराखड्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपूते, जिल्हा नियोजन अधिकारी सूनय लाड आदी उपस्थित होते.
डॉ. पांडे यांनी शेगावच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामाचा आढावा घेताना न्यायालयाच्या निर्देशानुसार कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. चौदा क्रमांकाचा रस्ता विकासासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावे. वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देताना ज्या आठ कुटुंबांच्या घराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मंदिर प्रशासनासोबत समन्वय साधून घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
विकास आराखड्यासोबतच शेगाव येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठा नियोजन, नो पार्किंग झोन, अतिक्रमणाबाबतचा आढावा घेतला.
जिल्ह्याचा आढावा घेताना डॉ. पांडे यांनी संपकाळात करण्यात आलेल्या उपययोजना, तसेच परिक्षा सुरळीत सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संसर्गजन्य आजाराची स्थिती असल्याने तसेच संपाचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम होणार असल्याने याबाबत योग्य उपाययोजना करावी. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि जनावरांची हानी होणार असल्याने यंत्रणांनी सतर्क राहावे. याबाबत तत्काळ माहिती देण्यात यावी.
महसूल उत्पन्न आणि विविध योजनेमध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. याचा दररोज आढावा घेण्यात यावा. प्रामुख्याने पूनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. जिल्ह्यासाठी जिगाव प्रकल्प महत्वाचा आह आहे. यातील सर्व कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करावे.
यावेळी डॉ. पांडे यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पाचा आढावा घेतला. सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जल पुनर्भरण, रुग्णालय आदी उपक्रमाची माहिती घेतली. तसेच वाहनतळामुळे घरांचा प्रश्न निर्माण झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. याबाबत म्हाडाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची सूचना डॉ. पांडे यांनी केली.
०००