बीड, दि.18 : पौष्टिक तृणधान्य च्या वाढीसाठी “मिशन मिलेट’ ला सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ज्वारी, बाजरी,वरई , नाचणी, राजगिरा या सारख्या तृणधान्याचा वापर आपल्या देशात पूर्वीपासून आदिवासी , ग्रामीण तसेच गरीब जनता करीत आहे. हे तृणधान्य आपल्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे दिसून आले असून त्याचे आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज बीड मधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त “मिलेट दौड”चे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार , अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी उत्तम पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यासह चंद्रकांत नवले , आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थिती होते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांचे सदस्य शासकीय अधिकारी कर्मचारी पत्रकार माध्यम प्रतिनिधी आदींचा दौड मध्ये सहभाग होता.
यावेळी पुढे बोलताना कृषी मंत्री श्री सत्तार म्हणाले की; देशातल्या पंजाब व हरियाणा या राज्यांच्या आरोग्यविषयक अहवालांमध्ये कर्क रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. हे राज्य पूर्वीपासून आपल्या देशाची गहू उत्पादन करणारी मोठे प्रदेश राहिले आहे. याचा हा परिणाम आहे का हे टाळण्यासाठी आपल्या आहारात ज्वारी बाजरी अशा तृणधान्याचा वापर वाढवण्यासाठी आपण आपल्या कुटुंबात आठवड्यातून एकदा तृणधान्याचा वापर करेल असा संकल्प करणे गरजेचे असल्याचेही म्हणाले,
ते पुढे म्हणाले , राज्य शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असून शेतकऱ्यांसाठी एक रुपया मध्ये पिक विमा देण्याचे योजना अमलात आणली जात आहे यासाठीचा प्रीमियम राज्य सरकार भरणार असून दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्यामुळे विमा भरपाई मिळेल. पण नुकसान झाले नाही. तर त्याचा सरकार वर भार राहील.बीड जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना लाभ मिळेल. पीक विम्या संदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढणार आहे. अवकाळी पावसामुळे देखील पिकांची व शेतकऱ्याचे स्थिती अडचणीची झाली आहे. त्यामुळे तातडीने पंचनामाचे करण्याचे आदेश दिले आहेत, असे मार्गदर्शन करताना राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री जेजुरकर यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.यानंतर मिलेट दौड छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) येथून राजुरी वेस → माळी वेस- → सुभाष रोड → अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राउंड) येथे मिलेट दौड ची सांगता करण्यात आली. सहभागी व्यक्तींसह शालेय विद्यार्थ्यांनी एकच मिशन मिलेट मिशन यासह विविध घोषणा देऊन तृणधान्य पौष्टिक आहार बाबतचे फलक हातामध्ये धरून दौंड मध्ये सहभाग घेतला यावेळी शहरातील आदित्य महाविद्यालयाचे विद्यार्थी ,चंपावती इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक ,स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीचा सहभाग होता.
000