मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

0
6
ठाणे, दि. १८ (जिमाका) : विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून वासिंद येथे थांबलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यानंतर मोर्च्या थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते. मागण्या मान्य झाल्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी अशोक शिनगारे  यांनी आज स्वतः जाऊन दिल्यानंतर लॉंग मार्चमधील शेतकरी मोर्चा थांबवून आपापल्या घरी परत निघून गेले.
माजी आमदार जिवा गावित यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून मागण्या मान्य केल्या. याबरोबरच बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे यांनीही शेतकऱ्यांचा शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र आज शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिले.
राज्य शासनाबरोबर शिष्टमंडळाच्या चर्चा होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधला होता. तसेच यासंदर्भात झालेल्या बैठकीचे निर्णय शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोचविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे मोर्चातील शेतकरी परत आपापल्या गावी आज निघून गेले. त्यांना सुखरूप आपल्या गावी जाता यावे यासाठी वासिंद रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे, रेल्वेची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here