‘नागपूर व्हॉईस’द्वारे जवळपास ४० संस्थांच्या सूचना प्राप्त
नागपूर, दि. १८ : नागपूर शहराला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. याच शहरात जी-२० परिषदेअंतर्गत २० ते २२ मार्च २०२३ दरम्यान आयोजित होणाऱ्या सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० परिषदेच्या मंथनातून महत्वाचे विचार बाहेर येतील, असा विश्वास सी-२० आयोजन समीतीचे सूस शेरपा डॉ. स्वदेश सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यकत् केला. या परिषदेत नागपूर व विदर्भातील २५ संस्थाही सहभागी होणार असून ‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास ४० संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
जी-२० परिषदेचे यजमानपद असणाऱ्या भारत देशात वर्षभर विविध एंगेजमेंट गृपच्या परिषदांचे आयोजन होत आहे. यापैकी एक असलेल्या सी-२० गृपच्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन नागपुरात होणार आहे. या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी प्रेस क्लब येथे डॉ सिंह यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. सी-२० अयोजन समीतीचे सुस शेरपा किरण के. एम., समन्वयक पंकज गौतम, माध्यम समन्वयक डॉ. परिणीता फुके, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरीक्त महासंचालक स्मिता शर्मा, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी उपस्थित होते.
सिव्हिल सोसायटीच्या आयोजन समितीद्वारे मागील चार महिन्यांपासून देश-विदेशातील नागरी संस्थांसोबत विविध मंचांद्वारे समन्वय साधून आरोग्य, रोजगार, कला, मानवाधिकार, सेवा आदि चौदा विषय भारतातील सी -२० परिषदेच्या चर्चेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. सी-२० ची प्रारंभिक बैठक नागपुरात होत आहे. या परिषदेतून महत्वाचे विचार बाहेर येतील आणि ३० व ३१ जुलै २०२३ रोजी जयपूर येथे होणाऱ्या सी-२० परिषदेच्या शिखर परिषदेत सादर होणाऱ्या अंतिम प्रस्तावात हे विचार अंतर्भूत होतील, असा विश्वास डॉ. सिंह यांनी व्यक्त केला.
जी-२० देशांच्या नागरी संस्थांचे जवळपास ६० प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था व आमंत्रित देशांचे असे जवळपास ३०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपूर व विदर्भातील जवळपास १००० संस्थांनी अर्ज केले होते. यापैकी २५ संस्थांची या परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास ४० संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सी-२० परिषदेच्या आयोजनादरम्यान नागपूर व विदर्भात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरी संस्थांना या उपक्रमांतर्गत सूचना व मते मागविण्यात आली होती. संस्थांकडून प्राप्त सूचना सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्याकडे निवेदन स्वरुपात सुपूर्द करण्यात येणार असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.
शहरातील रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सी-२० चे आयोजन करण्यात आले असून २० मार्च रोजी दुपारी ३ वा. या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जी-२० साठी भारताचे शेरपा डॉ. अमिताभ कांत, संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतातील प्रतिनिधी शैामी शाह, इंडोनेशिया आणि ब्राझीलचे जी-२० शेरपा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रसार माध्यमांसाठी मिडीया लाऊंज
सी-२० या जागतिक परिषदेचे वृत्तांकण करण्यासाठी रॅडिसन ब्लु हॉटेल परिसरात मिडीया लाऊंज उभारण्यात आला आहे. याठिकाणी माध्यमांना वेळोवेळी माहिती व फोटो व्हिडीयो पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.
उद्घाटनानंतर सलग दोन दिवस सी-२० साठी तयार करण्यात आलेल्या अजेंड्यावर चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे. सी – २० परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी २० मार्च रोजी सायंकाळी फुटाळा येथे फाऊंटन शोचे आणि तेलनखेडी गार्डन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी हे प्रतिनिधी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि देवलापार गौ-संशोधन केंद्र, सेवाग्राम आणि पवनार येथे भेट देणार असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.
000