एनसीपीएमध्ये उद्या रविवारी अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांचा ‘गंगा’ नृत्याविष्कार; राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन

मुंबई, दि.१८ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या ‘चला जाणू या नदीला’ या अभियानाचा एक भाग म्हणून अभिनेत्री, नृत्यांगना आणि खासदार हेमामालिनी यांचा नाट्यविहार प्रस्तूत ‘गंगा’ हा नृत्याविष्कार कार्यक्रम रविवार १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला असून या संगीत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या कार्यक्रमास राज्यपाल रमेशसिंह बैस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, सांस्कृतिक कार्य विभागाचे  प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, व्यवसाय उद्योग क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जमशेद भाभा सभागृह एन. सी. पी. ए. येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित या कार्यक्रमातून गंगा मिशन, जल संवर्धन, नदी स्वच्छता यासंदर्भात लोकसहभाग वाढविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असून राज्यात यासाठी गेल्या वर्षी महात्मा गांधी जयंतीपासून व्यापक प्रयत्न सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

जलसंवर्धन आणि नदी जोड प्रकल्पासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला आहे; या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक व्यापक पद्धतीने हा विचार आपण पुढे नेऊ असा विश्वास आहे,  असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

०००